चिमुकलं बाळः दिसलं, वाटलं अन् लिहीलं.....
वडिलांच्या आजारपणामुळे आमचे फॅमिली
डॉक्टर किशोर चिटणीस यांच्या रुग्णालयात गेले काही दिवस एक प्रकारे पडून होतो.
खरतर चिटणीसांचं घर, दवाखाना आणि रुग्णालय एकाच इमारतीत. ते खरंतर बाळंतपण या विषयातले निष्णात डॉक्टर. त्यामुळे ओळखीच्यांवरच अन्य
गोष्टींवर उपचार बाकी पेशंट या बाळंतपणाच्या उपचारांसाठी किंवा प्रत्यक्ष
बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त. पण हे चिटणीस हॉस्पिटल निदान
आमच्यासाठीतरी घरच्यासारखंच.
इथेले लहान मुलांचे टॅहँ... टॅहँ.... असे
रडण्याचे येणारे आवाज कोणाच्याही मनात प्रेम, वात्सल्याची भावना निर्माण होते. मऊ
कापडात गुंडाळलेली ती इटुकली पिटुकली बाळं... कित्ती गोड दिसतात. चिमुकले हात पाय,
कधी झोपेतच हसणं, कधी हात पाय झाडणं, गाढ गुडुप झोपणँ आणि मधुनच अचानकपणे टॅहँ...
टॅहँ.... मावश्यांची, सिस्टर्सची लगबग, अगदी मायेने पण चपळाईने त्या चिमुकल्यांना
हाताळणं.. खरोखरच माऊलीच करु जाणे. दोन चार दिवसांच्या तान्हुल्याला ज्या पद्धतीने
त्या भल्या पहाटे अंघोळ घालून झोपवतात ते फक्त आणि फक्त त्याच करु शकतात असं
वाटतं. एखादी अगदी काही वेळात बाळंत होईल असं वाटणाऱ्या गर्भवतींना घेऊन येणारे
त्यांचे नातेवाईक, त्यांच्यावर असणारा अल्पसा तणाव, अस्वस्थता. तिच्या
नातेवाईकांना घाईघाईने पण विश्वासाचे चार शब्द सांगणारे रुग्णालयाते कर्मचारी..
खरंत ते जगच वेगळं असतं असं वाटतं. या सगळ्यादरम्यान कानावर पडणाऱ्या काही गंमतशीर
गोष्टी म्हणजे प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या त्या महिलेच्या
नातेवाईकांचे संवाद. ते तर फारच गंमतशीर वाटतात काहीवेळा. अस्वस्थता, चिंता, हुरहुर,
अनावश्यक घाई, काय होणार मुलगा का मुलगी याची चर्चा... अजूनही 10 पैकी 4 लोकांकडून
मुलगा हवा मुलगी नको असा दबका सूर इथे ऐकायला मिळतोच.
बाबांच्या दिवसभर विविध चाचण्या, सकाळी
नास्ता, नंतर जेवण, संध्याकाळी पुन्हा काहीतरी खाणं, रात्री जेवण. मधल्या वेळात
बाबांना भेटायला येणारे या सगळ्यामुळे अनेकदा वर – खाली व्हायचं.
त्या दरम्यान एकदा सकाळच्या वेळात शहाळं आणण्यासाठी खाली उतरलो. सकाळी
साधारण साडेसातच्या सुमारासची गोष्ट. जाता जाता सहज नजर गेली ती याच
रुग्णालयापासून फक्त 50 फुटांच्या अंतरावर एका दुकानाच्या बाहेर. दुकानं उघडायला
वेळ, त्यामुळे रात्री फुटपाथवर मुक्काम करणारे, काही रात्री जास्त झालेले, काही
असे ज्यांचा मुक्कामचं असतो फुटपाथवर. अडचणीमुळे किंवा स्वतःच्याच कु कर्तृत्वाने.
तीथे दुकानाच्या बाहेरच्या पायरीवर एका एक साधारण पंचविशीची महिला काही गुंडाळतांना
दिसली. आता सहज प्रश्न पडेल, यात लक्ष जाण्यासारखं काय. खरंही आहे ते. पण सहज
जातजात नजर जावी असंच होतं ते. पुढच्या क्षणी मला एक लहानसं बाळ दिसलं. अगदिच
चिमुलकलं होतं. काही दिवसांचंच. कदाचित सात – आठ दिवसांचं.
एकदम गोड दिसत होतं ते. मला लहान बाळांबद्दल मोठं आकर्षण, त्यामुळे मी क्षणभर
थांबलो. पण त्या महिलेपासून साधारण पाच सात फुटांवर. दुकानाच्या पायरीवरच
थांबल्यानं आता मला ते बाळ एकदम स्पष्ट दिसत होतं. ती भिकारीण तीच्या बाळाला आंघोळ
झाल्यावर दुपट्यात बांधतात तसं बांधत होती. एका मळक्या साडीचा मोठा तुकडा केलं
होतं तिने. ते बाळ बऱ्यापैकी झोपेला आलं होतं. त्याला त्या माऊलीनं एका छोट्याश्या
भांड्यातल्या गार पाण्यानं त्याला नुकतीच आंघोळ घातली असावी, कारण बाजूलाच एक एक
मोठं आणि एक छोटं भांडे पडलं होतं आणि बरचसं पाणी सांडलं होतं. तीच्या जवळ तीचा
नवरा ठार झोपला होता. त्याला कशाची पडली नसावी असं किंवा बिचारा खूप मेहनतीमुळे
गाढ झोपला असावा. माऊलीने त्या चिमुकल्याला ठान गुंडाळलं आणि आपल्या उराशी
कवटाळलं, एक गोड पापा घेतला अन् छातीशी धरलं.
मी माझ्या वडिलांसाठी नारळपाणी आणायला
पुढे निघालो. एक दहा मिनीटात परत आलो.. आता माझ्या मनात एक अकारण उत्सुकता होती,
त्या बाळाबद्दल. कारण मलाही सांगता येणार नाही. माझं त्याचं नातंही नाही किंवा मला
- त्याला जोडणारा एकही दुवा नाही. पण तरीही मला छोटीशी उत्सुकता होती कारण ते चिमुकलं.
चालता चालता सहज माझी नजर पुन्हा त्या माय लेकरांकडे वळली. ती माऊली आपल्या
बाळामध्ये एकरुप झाली होती. आजूबाजूला काय सुरु आहे त्याकडे तीचं अजिबात लक्ष
नव्हतं. येणा जाणारी वाहनं, आवाज, येणा जाणारी लोकं, कशा कशाकडे तीचं लक्ष नव्हतं.
माझ्या डोक्यात प्रश्न आला, दोन – चार दिवसांचं बाळ ते, बहुदा रस्त्याच्या बाजूलाच जन्मलेलं असावं. कोण आणि काय
काळजी घेत असेल त्याची. प्रसुतीगृह हाकेच्या अंतरावर असतांना त्या बाळाचा जन्म
मात्र रस्त्यावरचाच. मी माझ्या दुसऱ्या वालपणाकडे झुकलेल्या वडिलांच्या प्रकृतीची
काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो, तर दुसरीकडे सर्वार्थाने बाळ असलेल्या त्या
चिमुकल्याचं मात्र....,
बरं अशी काही रस्त्यावर जन्मलेल्या
बाळांना कुठली लस दिली जाते हो..तर ती धडधाकट असतातच. किंबहूना अशा बाळांमध्ये
सहनशक्ती आणि प्रतिकारशक्ती जास्त असते असं वाटतं.
इकडे चिटणीस हॉस्पिटलसारखी तीथे बाळाच्या
नातेवाईकांची लगबग नव्हती की त्या चिमुकल्याला गुंडाळायला छानसं दुपटं. डॉक्टरांची
देखरेख नव्हती की काळजी घेणाऱ्यांची वर्दळ. औषधांची यादी नव्हती की बाळंतकाढे, मालीश,
धूप-शेक, पौष्टीक खाणं बाळंतीणीला हक्काची विश्रांती देणारी तिची माय किंवा कोणी
कोणी नव्हतं तिथे. या किंवा अशा सगळ्यांशिवाय ती माऊली आपल्या तान्हुल्याची ज्या
पद्धतीने काळजी घेत होती ते पाहून अत्यंतिक कौतुक वाटलं अन् काळजीही. अशा पद्धतीने
देशात अनेक माता आपल्या स्वतःची बाळंतपणं करत असतील आणि काळजीही घेत असतील. अशा सगळ्या
मातांना नमनच केलं पाहीजे.
दोन चार मिनीटं थांबल्यानंतर मी माझ्या
वडिलांच्याकडे गेलो. पुढे साधारण साडे आठला पुन्हा खाली फतरलो तो घरी जाण्यासाठी.
सहजच माझी नजर पुन्हा त्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईला शोधू लागली. पण तिथे
कोणीही नव्हतं. अगदी ढाराढूर झोपलेला त्या बाळाचा बापही नाही. पुढचे दोन दिवसही
थोड्या फार फरकानं हेच दृष्य मी पाहीलं. दोन दिवसांनी माझ्या बाबांना घरी सोडण्यात
आलं. मी त्या चिमुकल्याला विसरुनही गेलो. आणखी काही दिवसांनी मला पुन्हा हे सगळं
आठवलं ते ठाण्यातल्या एका सिग्नलला खांद्यावर असंच चिमुकलं बाळ घेऊन भीक मागत
उभ्या असलेल्या एका महिलेमुळे. माझं मन मला पुन्हा खायला लागलं. कुठे असेल, कसं
असेल ते बाळ, त्याची आई, काय करत असेल त्याचा बाप, त्याना काही मदत करत असेल का.
ते आजारी तर पडलं नसेल ना. भर रस्त्यात खाडकन मी जागच्या जागी उभा राहीलो. क्षणभर
डोळे मिटले देवाकडे प्रार्थना केली,
हे परमेश्वरा, त्या बाळाला, त्या माऊलीला
सुखी ठेव...!
