Thursday, 7 November 2013






चिमुकलं बाळः दिसलं, वाटलं अन् लिहीलं.....



वडिलांच्या आजारपणामुळे आमचे फॅमिली डॉक्टर किशोर चिटणीस यांच्या रुग्णालयात गेले काही दिवस एक प्रकारे पडून होतो. खरतर चिटणीसांचं घर, दवाखाना आणि रुग्णालय एकाच इमारतीत. ते खरंतर बाळंतपण या विषयातले निष्णात डॉक्टर. त्यामुळे ओळखीच्यांवरच अन्य गोष्टींवर उपचार बाकी पेशंट या बाळंतपणाच्या उपचारांसाठी किंवा प्रत्यक्ष बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त. पण हे चिटणीस हॉस्पिटल निदान आमच्यासाठीतरी घरच्यासारखंच.
इथेले लहान मुलांचे टॅहँ... टॅहँ.... असे रडण्याचे येणारे आवाज कोणाच्याही मनात प्रेम, वात्सल्याची भावना निर्माण होते. मऊ कापडात गुंडाळलेली ती इटुकली पिटुकली बाळं... कित्ती गोड दिसतात. चिमुकले हात पाय, कधी झोपेतच हसणं, कधी हात पाय झाडणं, गाढ गुडुप झोपणँ आणि मधुनच अचानकपणे टॅहँ... टॅहँ.... मावश्यांची, सिस्टर्सची लगबग, अगदी मायेने पण चपळाईने त्या चिमुकल्यांना हाताळणं.. खरोखरच माऊलीच करु जाणे. दोन चार दिवसांच्या तान्हुल्याला ज्या पद्धतीने त्या भल्या पहाटे अंघोळ घालून झोपवतात ते फक्त आणि फक्त त्याच करु शकतात असं वाटतं. एखादी अगदी काही वेळात बाळंत होईल असं वाटणाऱ्या गर्भवतींना घेऊन येणारे त्यांचे नातेवाईक, त्यांच्यावर असणारा अल्पसा तणाव, अस्वस्थता. तिच्या नातेवाईकांना घाईघाईने पण विश्वासाचे चार शब्द सांगणारे रुग्णालयाते कर्मचारी.. खरंत ते जगच वेगळं असतं असं वाटतं. या सगळ्यादरम्यान कानावर पडणाऱ्या काही गंमतशीर गोष्टी म्हणजे प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांचे संवाद. ते तर फारच गंमतशीर वाटतात काहीवेळा. अस्वस्थता, चिंता, हुरहुर, अनावश्यक घाई, काय होणार मुलगा का मुलगी याची चर्चा... अजूनही 10 पैकी 4 लोकांकडून मुलगा हवा मुलगी नको असा दबका सूर इथे ऐकायला मिळतोच.


बाबांच्या दिवसभर विविध चाचण्या, सकाळी नास्ता, नंतर जेवण, संध्याकाळी पुन्हा काहीतरी खाणं, रात्री जेवण. मधल्या वेळात बाबांना भेटायला येणारे या सगळ्यामुळे अनेकदा वर खाली व्हायचं. त्या दरम्यान एकदा सकाळच्या वेळात शहाळं आणण्यासाठी खाली उतरलो. सकाळी साधारण साडेसातच्या सुमारासची गोष्ट. जाता जाता सहज नजर गेली ती याच रुग्णालयापासून फक्त 50 फुटांच्या अंतरावर एका दुकानाच्या बाहेर. दुकानं उघडायला वेळ, त्यामुळे रात्री फुटपाथवर मुक्काम करणारे, काही रात्री जास्त झालेले, काही असे ज्यांचा मुक्कामचं असतो फुटपाथवर. अडचणीमुळे किंवा स्वतःच्याच कु कर्तृत्वाने. तीथे दुकानाच्या बाहेरच्या पायरीवर एका एक साधारण पंचविशीची महिला काही गुंडाळतांना दिसली. आता सहज प्रश्न पडेल, यात लक्ष जाण्यासारखं काय. खरंही आहे ते. पण सहज जातजात नजर जावी असंच होतं ते. पुढच्या क्षणी मला एक लहानसं बाळ दिसलं. अगदिच चिमुलकलं होतं. काही दिवसांचंच. कदाचित सात आठ दिवसांचं. एकदम गोड दिसत होतं ते. मला लहान बाळांबद्दल मोठं आकर्षण, त्यामुळे मी क्षणभर थांबलो. पण त्या महिलेपासून साधारण पाच सात फुटांवर. दुकानाच्या पायरीवरच थांबल्यानं आता मला ते बाळ एकदम स्पष्ट दिसत होतं. ती भिकारीण तीच्या बाळाला आंघोळ झाल्यावर दुपट्यात बांधतात तसं बांधत होती. एका मळक्या साडीचा मोठा तुकडा केलं होतं तिने. ते बाळ बऱ्यापैकी झोपेला आलं होतं. त्याला त्या माऊलीनं एका छोट्याश्या भांड्यातल्या गार पाण्यानं त्याला नुकतीच आंघोळ घातली असावी, कारण बाजूलाच एक एक मोठं आणि एक छोटं भांडे पडलं होतं आणि बरचसं पाणी सांडलं होतं. तीच्या जवळ तीचा नवरा ठार झोपला होता. त्याला कशाची पडली नसावी असं किंवा बिचारा खूप मेहनतीमुळे गाढ झोपला असावा. माऊलीने त्या चिमुकल्याला ठान गुंडाळलं आणि आपल्या उराशी कवटाळलं, एक गोड पापा घेतला अन् छातीशी धरलं.


मी माझ्या वडिलांसाठी नारळपाणी आणायला पुढे निघालो. एक दहा मिनीटात परत आलो.. आता माझ्या मनात एक अकारण उत्सुकता होती, त्या बाळाबद्दल. कारण मलाही सांगता येणार नाही. माझं त्याचं नातंही नाही किंवा मला - त्याला जोडणारा एकही दुवा नाही. पण तरीही मला छोटीशी उत्सुकता होती  कारण ते चिमुकलं. चालता चालता सहज माझी नजर पुन्हा त्या माय लेकरांकडे वळली. ती माऊली आपल्या बाळामध्ये एकरुप झाली होती. आजूबाजूला काय सुरु आहे त्याकडे तीचं अजिबात लक्ष नव्हतं. येणा जाणारी वाहनं, आवाज, येणा जाणारी लोकं, कशा कशाकडे तीचं लक्ष नव्हतं.
माझ्या डोक्यात प्रश्न आला, दोन चार दिवसांचं बाळ ते, बहुदा रस्त्याच्या बाजूलाच जन्मलेलं असावं. कोण आणि काय काळजी घेत असेल त्याची. प्रसुतीगृह हाकेच्या अंतरावर असतांना त्या बाळाचा जन्म मात्र रस्त्यावरचाच. मी माझ्या दुसऱ्या वालपणाकडे झुकलेल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो, तर दुसरीकडे सर्वार्थाने बाळ असलेल्या त्या चिमुकल्याचं मात्र....,
बरं अशी काही रस्त्यावर जन्मलेल्या बाळांना कुठली लस दिली जाते हो..तर ती धडधाकट असतातच. किंबहूना अशा बाळांमध्ये सहनशक्ती आणि प्रतिकारशक्ती जास्त असते असं वाटतं.

इकडे चिटणीस हॉस्पिटलसारखी तीथे बाळाच्या नातेवाईकांची लगबग नव्हती की त्या चिमुकल्याला गुंडाळायला छानसं दुपटं. डॉक्टरांची देखरेख नव्हती की काळजी घेणाऱ्यांची वर्दळ. औषधांची यादी नव्हती की बाळंतकाढे, मालीश, धूप-शेक, पौष्टीक खाणं बाळंतीणीला हक्काची विश्रांती देणारी तिची माय किंवा कोणी कोणी नव्हतं तिथे. या किंवा अशा सगळ्यांशिवाय ती माऊली आपल्या तान्हुल्याची ज्या पद्धतीने काळजी घेत होती ते पाहून अत्यंतिक कौतुक वाटलं अन् काळजीही. अशा पद्धतीने देशात अनेक माता आपल्या स्वतःची बाळंतपणं करत असतील आणि काळजीही घेत असतील. अशा सगळ्या मातांना नमनच केलं पाहीजे.
दोन चार मिनीटं थांबल्यानंतर मी माझ्या वडिलांच्याकडे गेलो. पुढे साधारण साडे आठला पुन्हा खाली फतरलो तो घरी जाण्यासाठी. सहजच माझी नजर पुन्हा त्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईला शोधू लागली. पण तिथे कोणीही नव्हतं. अगदी ढाराढूर झोपलेला त्या बाळाचा बापही नाही. पुढचे दोन दिवसही थोड्या फार फरकानं हेच दृष्य मी पाहीलं. दोन दिवसांनी माझ्या बाबांना घरी सोडण्यात आलं. मी त्या चिमुकल्याला विसरुनही गेलो. आणखी काही दिवसांनी मला पुन्हा हे सगळं आठवलं ते ठाण्यातल्या एका सिग्नलला खांद्यावर असंच चिमुकलं बाळ घेऊन भीक मागत उभ्या असलेल्या एका महिलेमुळे. माझं मन मला पुन्हा खायला लागलं. कुठे असेल, कसं असेल ते बाळ, त्याची आई, काय करत असेल त्याचा बाप, त्याना काही मदत करत असेल का. ते आजारी तर पडलं नसेल ना. भर रस्त्यात खाडकन मी जागच्या जागी उभा राहीलो. क्षणभर डोळे मिटले देवाकडे प्रार्थना केली,

हे परमेश्वरा, त्या बाळाला, त्या माऊलीला सुखी ठेव...!

Sunday, 6 October 2013

पृथ्वीराज चव्हाणांची पक्षीय राजकारणात जीत, पण खरं आव्हान पुढेच.....!


राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे ती, राहूल गांधीची वट आणि हुकूम याची. पण त्याच वेळी राज्यातल्या काही राजकीय चाली आणि घटनांकडे मात्र राजकीय निरिक्षकांचं थोडं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी तसच पंतप्रधानांचे विश्वासू पृथ्वीराज चव्हाण यांची. पृथ्वीराज चव्हाण राज्यात नेतृत्वाची कमाल सांभाळण्यासाठी आहे तेंव्हा त्यांच्या मि. क्लीन आणि अभ्यातूपणाची चर्चा झाली. पण त्याच वेळी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातल्या राजकारणाचा काय अनुभव असा प्रश्नही आवर्जून विचारला गेला. राज्यातल्या राजकारणाच्या आखाड्यात ते किती यशस्वी होतील याबद्दल अनेकांनी शंकाही उपस्थित केली. यामध्ये काही प्रमाणात तथ्य होतं. केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये पडद्यामागे अनेक गोष्टी नीट व्हाव्यात यासाठी धडपडणाऱ्यांमध्ये चव्हाण यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. अणुकराराच्या वेळी चव्हाणांनी केलेल्या पूर्व आणि पूर्ण तयारीचं पंतप्रधानींही जाहीर कौतुक केलं होतं.


कायम केंद्रातच राहीलेले आणि राज्याच्या राजकारणाचा फारच कमी संबंध असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र आपण राज्याच्या राजकारणात चांगलेच तरबेज असल्याचं गेल्या काही काळातल्या निर्णयातून दाखवून दिलं आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यापासून सर्व विरोधक आणि अजित पवारांसारख्या सत्तेतल्या सहकाऱ्यांनीही चव्हाण यांच्यावर खरपूस टीका केली. नक्कल केली, टपल्या, कोपरखळ्या, खोचक टीका यासारखी सगळ्या प्रकारांची टीका झाली. पण दरवेळी चव्हाणांनी हसत हसत त्याचा स्विकार केल्याचं दिसतं. अगदी अलिकडच्या काळात शरद पवार यांनी जाहीरपणे, काही जणांना लकवा भरल्याची जळजळीत टीका करुनही चव्हाणांनी योग्य वेळी उत्तर देऊ म्हणत म्हणत, नियमबाह्य कामं आली तर विचार करावाच लागतो असं जे उत्तर दिलं ते संयमीत पण तेवढंच रोख ठोक प्रत्योत्तर होतं. शरद पवार यांच्या आरोपांना तोडीस तोड असंच होतं. यानंतर शरद पवार यांनीही या बद्दलल बोलायचं टाळलं आणि चव्हाणांनीही काहीही घडलंच नाही असं दाखवलं. याबद्दलही त्यांना मानायला हवं. कारण बरंच काही झाल्यावरही काहीच घडलेलं नाही हे दाखवणं हेच मुरब्बी राजकारण्याचं लक्षण.

पृथ्वीराज चव्हाण राज्यात आल्यावर त्यांना राज्याचं राजकारण कसं जमणार असं काँग्रेसजनांनाही वाटतं होतं. पण चव्हाणांनी राज्य तर सांभाळलंच पण त्याच बरोबर महाराष्ट्र काँग्रेसची जी डोकेदुखी होती, त्या राष्ट्रवादीवरही बऱ्यापैकी वचक बसवला. राज्य सहकारी बँकेवर प्रशासक बसवून चव्हाणांनी थेट अजित पवार यांनाच वेसण घातली. राज्याच्या सिंचनावरुन वाद सुरु झाला त्यावेळी सिंचन विभागाच्या आकड्यांना खोटं पाडून मुख्यमंत्र्यांनी अजितदादांची आणखी गोची केली. या दोन्ही गोष्टींमुळे की काय अजितदादा सध्या फारच शांत आहे. ( का ही वादळापूर्वीची शांतता आहे त्यांनाच माहीत ) मध्यंतरी राष्ट्रवादीचे काही मंत्री मालकाप्रमाणे वागतात असं म्हणत मुखयमंत्र्यांनी राष्ट्रवादीला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. एका बाजुला एमएमआरडीएची 40 हजार कोटीची कामे बिनाबोभाट काढली जातात तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांची बीओटीची कामे रखडून ठेवली जात आहेत. राज्यातील जी महामंडळ राष्ट्रवादीकडे आहेत, त्याची विविध बाजूंनी कोंडी केली आणि त्याबाबतीतही राष्ट्रवादीवर कुरघोडी केली. गेल्या बारा वर्षात दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने उभे केलेले आव्हान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षांच्या अथक परिश्रमांनी आटोक्यात आणले आहे. अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना आणि आमदारांना निधी वाटपात दुय्यम वागणूक देणं, 13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटाचे वेळी गृहखात्याच्या कारभारावर पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर नाराजी व्यक्त करणं, काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांना कोंडीत पकडून पाण्याचा प्राधान्यक्रम बदलून घेणं असा शह कटशहाचा सामना आघाडीत अनेक वेळा रंगला. 
मंत्र्या मंत्र्यांमध्येमंत्रिमंडळ बैठकीत किंवा नंतर जाहीर वाद घडणं ही तर नित्याचीच बाब होऊन बसली आहे. मधल्या काळात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामनाही जोरात रंगला. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली आणि राष्ट्रवादीला अंगावर घेणाऱ्यांनाही प्रोत्साहनच दिलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांकडे आधीचे मुख्यमंत्री बघतही नव्हते, तसेच पृथ्वीराजबाबा वागतील, असे राष्ट्रवादीला वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. प्रत्येक वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या वाटयाला आलेल्या खात्यातही हस्तक्षेप केला आणि सवंग घोषणा करण्यापासून राष्ट्रवादीला त्यांनी अडविले.  राष्ट्रवादीचे मोठमोठे दावे कसे फोल आहेत, खोटे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जागोजागी नाकेबंदी झालीराज्यात ऊर्जा, सिंचन, गृह अशा राष्ट्रवादीकडे अशलेल्या महत्वाच्या खात्यांबद्दलच विविध आरोप झाले, भ्रष्ट्राचाराची प्रकरणीही बाहेर आणि किंवा आणली गेली ती राष्ट्रवादीच्याच खात्यांची. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या स्क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतच्या उपोषण आंदोलनातली हवा काढतांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि नियमानुसारच कामं होतील असं बजावलही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच त्यांनी पाठवलं. आणि आपला शब्द त्या अर्थाने खर्ची पडू दिला नाही. 

        

असं असलं तरीही आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी सुमारे वर्षांचा अवधी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना बांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याचे ठरविले. मात्र , काँग्रेस पक्षात काही ठोस कार्यक्रम राबविले जात नाही. विदर्भ , मराठवाड्यात काँग्रेसचा जनाधार असला तरी तेथील विकासाचे प्रश्न कायम आहेत. दलित ,आदिवासी , अल्पसंख्याक या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांचे प्रश्न जैसे थे आहेत. मात्र काँग्रेसचे जागृती अभियान, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर असे काही प्रयत्न सध्या सुरु झाले आहेत. पण ते कमी आहेत असं वाटतं. काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला चेपण्याचे कितीही प्रयत्न करत असले तरी विरोधकांचे डावपेच आणि जनतेतली नाराजी यावर विजय मिळवणं काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यामध्ये यशस्वी होणं मात्र तूर्तास अवघड दिसतंय. अर्थात निवडणुका आल्या की एकमेकांना कितीही लाथाळ्या मारणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते 'जातीयवादी शक्तींना विरोध' या अजेंड्याखाली एकत्र येतात हेही आता राज्यातल्या जनतेला माहिती झालंय. त्यामुळे राजकारणाच्या या निवडणूकरुपी महाकुंभात खऱ्या अर्थाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यातल्या मुरब्बी राजकारण्याची कसोटी आता लागणार हे मात्र निश्चित आहे. 

Sunday, 15 September 2013

शुभम् भवतु.... !



गेल्या काही वर्षापासून पत्रकारीतेत आहे.

दररोज वेगवेगळ्या बातम्या, चर्चा, वाद-विवाद आणि बरच काही. या सगळ्यातून स्वतःची तयार झालेली काही मतं. काही ऑन द रेकॉर्ड तर काही ऑफ द रेकॉर्ड. पडद्यावर काही अन् पडद्यामागेही. बातम्या सगळ्या प्रकारच्या. राजकीय, सामाजिक समस्या, आर्थिक, खेळांच्या, शहराच्या, गावच्या, शेतीच्या, गल्लीतल्या, दिल्लीतल्या आणखीही खूप...  बातम्यांनुसार कधी राग, कधी आपुलकी, कधी स्पर्धा, कधी दुःख, कधी संताप, कधी निराशा, कधी प्रश्न तरी कधी चुकुन उत्तरंही... कधी चर्चा, कधी भांडण, कधी समजून घेणं, कधी उमजणं, कधी संवाद तर कधी सुसंवाद...

हे सगळं बातम्यांच्याच विश्वातलं.. पण आपण राहतो त्या घरात, समाजात, मित्रांमध्ये इतरत्र असंही काही घडत असतं, ज्याकडे आपलं कधी लक्ष असतं, कधी नसतं. काहींचा आपल्यावर परिणाम होतो, तर काहींचा अजिबात नाही. काही घटनांनी 'आपल्यातला माणूस' जागा होतो, तर काही वेळा तो हताश होतो. आपल्याला काही प्रश्न सतावतात, काहींची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, तर काहींच्या फंदातच पडत नाही. काही वेळा प्रश्नांची उत्तरं, तर काही वेळा प्रश्नातून प्रश्न...

या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या मनातले काही विचार मांडणार आहे. मी मांडेन ते योग्य असेलच असं नाही. तुम्हाला पटेलही किंवा पटणार नाही. प्रश्न उपस्थित करेन, विचार मांडेन, आवाहन करेन. जे चांगलं असेल ते तुमचं, नसेल ते माझं.

समाजात सध्या फार काही भल सुरु नाही असं सगळे जणं म्हणतात. जे चांगलं नाही त्याबद्दल माझे विचार माडेनही पण जे काही चांगलं दिसेल ते मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. नेहमीप्रमाणे तुमच्या शुभेच्छा, मार्गदर्शन हव्यातच. तेंव्हा, शुभम् भवतु.... !